सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घमासान, आज घडणार 'या' 4 मोठ्या घडामोडी

सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घमासान, आज घडणार 'या' 4 मोठ्या घडामोडी

यंदा कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद मिळवायचंच, या इराद्याने शिवसेना मैदानात उतरली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. सध्याचे सरकार उद्या (शुक्रवारी) विसर्जित होणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट कल देऊनही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेमुळे भाजप आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेला विलंब होत आहे. यंदा कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद मिळवायचंच, या इराद्याने शिवसेना मैदानात उतरली आहे, तर शिवसेनेच्या या मागणीला भाजप अनुकूल नसल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडणार आहेत.

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. 'जनतेनं भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने त्यांनी सत्ता स्थापन करावी,' अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली असली तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग काँग्रेस नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे आजचा दिवस सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

शिवसेनेनं बोलावली आमदारांची बैठक

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपला आव्हान दिलेल्या शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांची आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत सत्तास्थापनेसाठीच्या सर्व पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदारांची ही बैठक सकाळी साडेअकरा वाजता 'मातोश्री' या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहे.

सत्तास्थापनेच्या हालचालींत गडकरींची एण्ट्री

राज्यातील राजकीय पेच सोडविण्याकरिता भाजपचे संकटमोचक म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पुढे आल्यानंतर आज गडकरी नागपूरला जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात एका कार्यक्रमात एकत्र येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यानंतर संघ महाराष्ट्रातील पेच सोडविण्याकरता सक्रिय झाला आहे. त्यानुसार नितीन गडकरी प्रमुख भूमिका बजावत असल्यामुळे या नागपूर दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि राज्याचे अर्थमंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे आज दुपारी 2 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. राजभवनात होणाऱ्या या भेटीत भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्राचं काळजीवाहू सरकार उद्या विसर्जित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसचे नेते पुन्हा दिल्लीत जाणार?

राज्यातील काँग्रेस नेते आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या भेट घेण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसच्या काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील बहुतेक काँग्रेस आमदार यांचा आग्रह भाजपा सरकार पुन्हा स्थापन होऊ नये असा होता. याबाबतची माहिती दिल्लीतील नेत्यांच्या कानावर घालण्यासाठी राज्यातील काही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

Published by: Akshay Shitole
First published: November 7, 2019, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading