भाजपची हायव्होल्टेज बैठक संपली, मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला रवाना

भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा न केल्यास दोन नंबरचा पक्ष असलेला शिवसेना सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 05:56 PM IST

भाजपची हायव्होल्टेज बैठक संपली, मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला रवाना

मुंबई, 10 नोव्हेंबर : भाजपच्या कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक अखेर संपली आहे. या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या बैठकीसाठी राजभवन इथं दाखल झाले आहेत. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे हा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस राज्यपालांच्या भेटीला गेले असल्याची शक्यता आहे.

भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नसल्याने आता त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येतो की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा न केल्यास दोन नंबरचा पक्ष असलेला शिवसेना सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेऊ शकतो. त्यामुळे पुढील काही क्षण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव भाजपच्या कोअर कमिटी बैठकीला उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन भूपेंद्र यादव वर्षावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, व्ही सतीश, विजय पुराणिक हा बैठकीला उपस्थित होते.

भाजप विरोधी पक्षात बसणार?

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना सोबत लढले. मात्र निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणार 145 चा जादुई आकडा नसल्याने त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करणं शक्य नाही. अशातच 105 जागा मिळवलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रणही दिलं आहे.

Loading...

या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असून या बैठकीत भाजप सत्तेत बसायचं की विरोधात, याबाबतचा अंतिम निर्णय झाल्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपचे नेते केंद्रीय नेतृत्वाच्या निरोपाच्या प्रतिक्षेत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानुसार राज्यातले नेते सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून विरोधी पक्षात बसण्याचाही निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण राज्यातील भाजप नेते अल्पमतात सरकार स्थापन करण्यास इच्छुक नाहीत.

दरम्यान, सत्तासंघर्षामुळे राज्यपालांचा नियोजित नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, बहुमताच्या अग्निपरीक्षेला भाजप सामोरे जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष भाजपला आमंत्रण दिले आहे. शिवसेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली. पण बहुमताचा आकडा गाठल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. निकालानंतर त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून एकमत झाले नाही आणि युतीची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर 8 नोव्हेंबर रोजी 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला. पण भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काळजावाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...