फडणवीसांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

फडणवीसांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी यांचं नाव समोर आल्यास सत्तेची कोंडी फुटू शकते, असा अंदाज बांधण्यात येत होता.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आलं. नितीन गडकरी यांचा शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत असलेला संवाद आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत असलेले संबंध लक्षात घेता, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव समोर आल्यास सत्तेची कोंडी फुटू शकते, असा अंदाज बांधण्यात येत होता. याबाबतच आता नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

'राज्यात भाजप आणि शिवसेना युतीला कौल मिळाला आहे. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री या न्यायाने भाजपचाच मुख्यमंत्री होईल. आमचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच पुन्हा सरकार स्थापन होईल. मी केंद्रात काम करत असल्याने पुन्हा राज्यात येण्याचा प्रश्न नाही,' असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

RSS भेटीबाबत गडकरींनी केलं भाष्य

नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची आज भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेच्या कोंडीवर चर्चा होईल, असं बोललं जात होतं. मात्र नितीन गडकरी यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. 'सत्तास्थापनेतील संघर्ष आणि सरसंघचालक यांचा संबंध जोडणे उचित होणार नाही,' असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

काय होती चर्चा?

महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वंयंसेवक संघ 'दक्ष' झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. गडकरी हे आज गुरूवारी (7 नोव्हेंबर) नागपूरला जाणार असून संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ते संघ मुख्यालयात जाणार असून तिथेच त्यांची आणि मोहन भागवतांची भेट होणार आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपमध्येही सरसंघचालकांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे ते नितीन गडकरींना काय संदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झालं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापना करताना शिवसेना भाजपसोबत असायलाच हवी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा फडणवीसांना करता येणार नाही असं सरसंघचालकांनी म्हटल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या