• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पगारवाढीचा प्रस्ताव, राज्य सरकारवर 600 कोटींचा भार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पगारवाढीचा प्रस्ताव, राज्य सरकारवर 600 कोटींचा भार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून संपकरी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याचं (ST employees strike) गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे सर्व सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडूनही (Maharashtra Government) प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आज वेगवान घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर अखेर राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. या पगारवाढीने एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

  राज्य सरकारचा नेमका प्रस्ताव काय?

  "गेल्या 10 ते 12 वर्षात नव्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. प्रामुख्याने या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ दिली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन साडेबारा हजार रूपये आहे, ते साडेअठरा हजार रूपयांच्या आसपास करण्याचा विचार एसटी महामंडळ प्रशासन करत आहे. दुसरीकडे ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कमी वेतनवाढ दिली जाईल", असं प्रस्तावात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत दाखल करून घेण्यासाठी विलीनीकरणासाठी विश्वासक प्रस्ताव तयार करण्यात आलाय. परिवहन मंत्रालयाच्या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही सकारात्मक विचार करत आहेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. हेही वाचा : एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि अनिल परबांमध्ये चर्चेची पहिली फेरी पूर्ण, चर्चेत काय ठरलं?

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघावा यासाठी काल (23 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेते गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दिली होती. या बैठकीत पगारवाढीच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पुन्हा एक बैठक झाली. त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत अनिल परब, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीत काही कर्मचाऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आले होते. ही बैठक दोन सत्रात झाली.

  परब आणि सामंत अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात

  या बैठकीनंतर अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आणि संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अनिल परब आणि उदय सामंतर मंत्रालयात दाखल झाले. तिथे त्यांनी अजित पवारांशी सविस्तर चर्चा झाली. या पगारवाढीच्या प्रस्तावामुळे राज्य सरकारवर दर महिन्याला 50 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करता अजित पवारांनी या प्रस्तावाला परवानगी दिली. हेही वाचा : देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

  अनिल परब आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट रुग्णालयात दाखल

  अजित पवार यांची बैठक संपल्यानंतर अनिल परब आणि उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी थेट HN रिलायन्स हाँस्पिटलमध्ये पोहचले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी निर्माण केलेला नवीन प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येईल आणि त्यानंतर पत्रकार परीषद घेऊन ST संपा संदर्भात मोठी निर्णायक घोषणा जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  Published by:Chetan Patil
  First published: