मोठा निर्णय : घराबाहेर न पडताच परीक्षा होणार; दोन दिवसात लागणार टाईमटेबल

मोठा निर्णय : घराबाहेर न पडताच परीक्षा होणार; दोन दिवसात लागणार टाईमटेबल

अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात निर्णय करणं भाग पडलं. आता अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. 'विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत न बोलवण्यावर राज्य सरकार ठाम आहे. आज यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आहे', अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा निर्णय घेणारी एक समिती राज्य सरकारने गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. त्यांच्याशी बैठक घेऊन परिक्षा कशी घ्यायची हे ठरवलं जाईल, असं सामंत म्हणाले. 'कुलगुरूंनी आणखी एक दिवस नियोजनासाठी मागितला आहे. त्यामुळे परवा संध्याकाळी ४ वाजता अंतीम निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत', असं ते म्हणाले.

राज्यातल्या 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रांवर परीक्षा द्यायला जावं लागू नये यासाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय निवडत आहोत, असं उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली आहे. तर काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली. आता बुधवारपर्यंत याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

कशी असेल परीक्षा? काय म्हणाले मंत्री?

- कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने परीक्षेसंदर्भात सूचना शासनाला कळवल्या

- एकूण 7,92,385 विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे.

- पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येईल.

- परीक्षा कमी मार्कांची असेल, म्हणजे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही

- विध्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम

- ऑनलाईन परिक्षे मध्येही अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल याचा विचार होईल.

- ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निर्णय होऊ शकतो.

- मुंबई युनिव्हर्सिटीने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची UGC कडे मागणी करावी अशी विनंती केली आहे.

- यशवंतराव मुक्त विध्यापीठाने आणि अमरावतीने 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षेसाठी मुदत मागितली आहे.

- दोन दिवसात आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून UGCकडे मागणी करणार आहोत.

- विध्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ

- काही कुलगुरूंनी सूचनांसाठी अजून एक दिवस मागितला आहे

- परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचं काय यासंदर्भात निर्णय घेऊ.

- विध्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे

- परवाच्या बैठकीत टाइम टेबलबाबत आखणी करू आणि मुख्यमंत्र्यांकडे माहिती ठेऊ

उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी 12 वाजता राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होणार आहे. त्यानंतर परीक्षा समितीची बैठक 4 वाजता होईल. त्यात जो निर्णय होईल तो शासनासमोर मांडण्यासाठी शेवटची बैठक घेण्यात येईल.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 31, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading