भाजपची नवी खेळी...शिवसेनेला दिला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव

भाजपची नवी खेळी...शिवसेनेला दिला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव

भाजपकडून शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर. भाजप नेत्यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.

  • Share this:

मुंबई,22 नोव्हेंबर:राज्यात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या 24 तासांत सत्ता स्थापनेबाबत महाविकासआघाडी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे भाजपची पुन्हा एकदा नवी खेळी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने मात्र मौन बाळगले होते. भाजपने आपण 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. आता मात्र भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक 'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने गुरूवारी शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या वृत्ताला कोणत्याही भाजप नेत्याने अद्याप दुजोरा दिला नाही. भाजपने सुरुवातीची अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ करण्याची नवी खेळी केली आहे. दुसरीकडे, भाजपने दिलेल्या प्रस्तावाबाबत शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजपच्या या प्रस्तावाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत शुक्रवारी सकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत काय बोलतात, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांचीही संयुक्त बैठक होणार आहे. सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेण्यात येणार असून सायंकाळी सरकार स्थापनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तर पुढील दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महिनाभरापासून निर्माण झालेली सत्तास्थापनेची कोंडी फुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची शुक्रवारी संयुक्त बैठक होणार असून त्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच मुद्यांवर एकमत झाले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पुढची रणनीती काय असावी यावरही शिवसेनेसोबत चर्चा होणार असून सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट होणार आहे. शिवसेना सोबत बैठक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्व नेते सोमवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर 27 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी होईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published: November 22, 2019, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading