Home /News /maharashtra /

Maharashtra Politics : 'ऊर्जामंत्र्यांना समज द्या', महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Maharashtra Politics : 'ऊर्जामंत्र्यांना समज द्या', महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

कोरोना काळात आलेल्या वाढील वीजबिलांचा मुद्दा प्रचंड गाजला. या वीजबिलांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा अनेकांना वाटली. पण तसं काहीच झालं नाही.

    विजय कमळे पाटील, प्रतिनिधी जालना, 27 जानेवारी : कोरोना काळात (Corona Pandemic) आलेल्या वाढील वीजबिलांचा मुद्दा प्रचंड गाजला. या वीजबिलांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा अनेकांना वाटली. पण तसं काहीच झालं नाही. अखेर सर्वसामान्यांनी थकबाकी बघून किंवा वीज कापली जावू नये म्हणून सर्व बिल भरले. पण खेड्यागावांमधील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. खेड्यागावांमध्ये शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना आसमानी संकटांपासून अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे अवाजवी वीजबिल भरण्यास ते असमर्थ ठरले. पण वीजबिल (Electricity Bill) भरलं नाही म्हणून ऊर्जा विभागाकडून (Energy Department) अनेकांचे कृषीपंपाची वीज कापणीचं काम सुरु करण्यात आलं. या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांनी अनेकदा आवाज उठवला. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना शेतकरी विरोधात भूमिका न घेण्याची तातडीने समज द्यावी, असं म्हटलं आहे. बबनराव लोणीकर पत्रात नेमकं काय म्हणाले? "मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टीमुळे सगळी पिके उद्ध्वस्त झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढी भीषण अवस्था आज मराठवाड्यामध्ये आहे. असे असले तरीदेखील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडले जात आहेत. ट्रान्सफॉर्मर बंद केले जात आहेत. निगरगट्ट झालेले प्रशासन याकडे मुद्दामहून डोळेझाक करत आहे", असं बबनराव लोणीकर पत्रात म्हणाले आहेत. (महाराष्ट्रात आता किराणा दुकानांमध्येही वाईन मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी लक्ष देणे गरजेचे असताना ते मात्र रजाकारी वृत्तीने वागत आहेत. प्रसारमाध्यमांवर जाहीर मुलाखतीदरम्यान शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील शेतकरी ऊर्जामंत्री यांचीही रजाकारी कदापी सहन करणार नाही", असा इशारा लोणीकर यांनी दिला. "शेतकऱ्यांची विजेचे कनेक्शन तोडतील किंवा ट्रान्सफॉर्मर बंद करतील त्या अधिकाऱ्यांना आम्ही पळता भुई थोडी करु. आवश्यकता पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याची गरज पडली तर ते देखील आम्ही करु. प्रसंगी त्या अधिकार्‍यांना त्यांच्या खुर्चीत आम्ही बसू देणार नाही. रजाकारी प्रवृत्तीच्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकरी विरोधी भूमिका न घेण्याबाबत तात्काळ समज द्या", असं बबनराव लोणीकर पत्रात म्हणाले आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या