रायचंद शिंदे जुन्नर, 7 एप्रिल : महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला असून, गावागावात रात्रीच्या वेळी करमणुकीला तमाशाचा खेळ ठरवला जातो. मात्र,यंदा राज्यात पडलेला भीषण दुष्काळ आणि जोडीला लोकसभा निवडणुकांचा हंगाम असल्याने ऐन हंगामात तमाशा पंढरीत तमाशाची सुपारी देण्यासाठी येणाऱ्या गावपुढाऱ्यांचा ओघ मात्र कमी झालेला दिसतोय. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणारं बुकींग थंडावलं आहे.
ढोलकीची थाप,टाळ्या शिट्यांचा कडकडाट आणि सोबतीला पायात वजनदार चाळ घालून ग्रामीण प्रेक्षकांचं गावजत्रेत दिलखुलास मनोरंज करणाऱ्या नर्तकी. हा अस्सल ग्रामीण नजराणा अनुभवायचा असेल तर तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी तुम्हाला अर्थात नारायणगावला जावंच लागेल. पण यंदा मात्र नारायणगावात गावपुढाऱ्यांची गर्दी मात्र कमीच दिसतेय .
तमाशाची पंढरी
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी अशी नारायणगावची ओळख आहे. तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचं हे गाव. मागील 40 वर्षांपासून इथे फडमालक तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्या उभारून आपली बुकिंग कार्यालय उभारतात. यंदाही पाडव्याच्या मुहूर्तावर इथे 34 फडमालकानी आपल्या राहुट्या उभारल्या आहेत. मात्र यंदाची सुपारी दुष्काळ आणि आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे.
अशी आहे तमाशा पंढरीतली उलाढाल
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यंदा 35 फडमालकानी एका दिवशी फक्त 100 करार केले. या माध्यमातून दिवसभरात फक्त 80 लाखांची उलाढाल झाली. दरवषी पाडव्याच्या दिवशी सुमारे 200 ते 250 फड बुक केले जातात आणि एका दिवसाची उलाढाल अडीच ते कोटीच्या आसपास होत असते.
दुष्काळ आणि आचार संहिता
यंदा दुष्काळ आणि निवडणूक आचारसंहिता यामुळे संपूर्ण हंगामात पन्नास टक्केच सुपाऱ्याचे करार झाले. एकूण हंगामात दरवर्षी 400 ते 500 फड बुक होतात आणि उलाढाल ७ ते ८ कोटींची होत असते ती यंदा ३ कोटींच्या पुढेही सरकली नाहीये.
महागाईचा फटका
मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतबंदी असल्याने त्यावर होणारा खर्च तमाशावर होणार होत होता. मात्र यासोबत वाढत्या महागाईचा मोठा सामना या फडमालकांना सतावत असताना यंदा दुष्काळाचा सामनाही फडमालकांना करावा लागतोय तर दुसरीकडे काही गावचे यात्रा प्रमुख आणि गावकरी कमी बजेटच्या तमाशांना प्राधान्य देत आहेत आणि तमाशा कला टिकवण्यासाठी प्रयत्नही करत आहेत.
सावकाराकडून तमाशा फडासाठी घेतलेली कर्ज घेत यंदा फिटेल की नाही अशा संभ्रमात फडमालक आहेत. तर दुसरीकडे गावची यात्रा वर्षातून एकदाच असते म्हणून गावकरी खर्चात काटकसर करून यात्रेत तमाशा ठेवतायेत. एकंदरीत महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ या सर्व संकटांवर मात करत पुढे टिकेल की नाही असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय.