मुंबई, 2 फेब्रुवारी : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असलं पाहिजे? यासाठी फडणवीस यांनी जनतेतून संकल्पना आणि सूचना मागवल्या आहेत. अशापद्धतीचा हा पहिलाच प्रयोग आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे.
27 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाचं वेळापत्रक ठरणार आहे, त्याआधी अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं भुषवली आहेत, पण अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. 'अर्थसंकल्प कसा वाचावा' हे पुस्तक त्यांनी आमदार असतानाच लिहिलं आहे. तसंच त्यांनी अर्थसंकल्पावर अनेक व्याख्यानं दिली आहेत. कालही केंद्रीय अर्थसंकल्पावर मुंबईत त्यांचं व्याख्यान झालं.
प्रिय महाराष्ट्र, आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. तयारी सुरू झाली आहे. पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे! तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा.. 👉🏼 https://t.co/eY6su1Led9 pic.twitter.com/2pCXJcrEa0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2023
यंदाच्या आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पावर जनतेच्या सुचनांचे, संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, म्हणून त्यांनी जनतेतून सूचना मागवल्या आहेत. संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis