Coronavirus चं थैमान! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज; चाचण्या वाढवा नाहीतर...

Coronavirus चं थैमान! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज; चाचण्या वाढवा  नाहीतर...

चाचण्यांची संख्या वाढवा, असं वारंवार सांगूनही दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या Covid test वाढवण्यात अद्याप महाराष्ट्र शासनाला यश आलेलं नाही. सर्वाधिक रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदेखील महाराष्ट्रातच झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सर्वाधिक प्रमाणात आहे. देशात आत्ता असलेल्या कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश उपचाराधीन रुग्ण (Active patients)महाराष्ट्रात आहेत. दैनंदिन रुग्णसंख्याही महाराष्ट्रात भीषण वेगाने वाढत आहे. याची दखल घेत आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र शासनाला कडक शब्दांत इशारा देण्यात आला आहे. सर्व पाहण्या आणि अभ्यासांमधून सातत्याने चाचण्यांची संख्या वाढवा, असं सांगण्यात येत असलं, तरी दर दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या Covid test वाढवण्यात अद्याप महाराष्ट्र शासनाला यश आलेलं नाही. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली नाही, तर कोरोना मृत्यू वाढतील आणि साथ खरोखर आटोक्याबाहेर जाईल, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिवांनी दिला आहे.

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनारुग्णांचं वेळेवर निदान होणं आणि विलगीकरणाची व्यवस्था लवकरात लवकर करणं हेच रुग्णसंख्या आणि मृत्यूदर आटोक्यात ठेवायचं सध्या माहीत असलेलं तंत्र आहे. वारंवार सूचना करूनही महाराष्ट्रात तरीही चाचण्यांची संख्या वाढलेली नाही. याबद्दल आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाला पत्र लिहून इशारा दिला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

महाराष्ट्रापेक्षा पॉझिटिव्हिटी कमी असूनसुद्धा दक्षिणेकडच्या सर्व राज्यांमध्ये अधिक चाचण्या होत आहेत. गुजरात, पंजाबातसुद्धा चाचण्यांचा दर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात मात्र दर 10 लाख लोकांमागे होणाऱ्या चाचण्यांचा दर कमी आहे. दररोज 300 ते 400 एवढ्याच दराने चाचण्या होत आहेत.  दहा लाखांमध्ये जास्तीत जास्त 583 दैनंदिन चाचण्या हा उच्चांक आहे आणि हे प्रमाण फारच कमी आहे.

महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक

महाराष्ट्रात इतर देशाच्या तुलनेत सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. कोरोना चाचणी केलेल्या 100 जणांमध्ये किती जणांचा Covid-19 test रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, याचं प्रमाण म्हणज पॉझिटिव्हिटी रेट. गेल्या काही दिवसात हा रेट प्रचंड वाढला आहे. महाराष्ट्राचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांच्या आसपास असला, तरी गेल्या काही दिवसांत हा दर वाढला आहे. गेल्या महिन्याचा विचार केला, तर किती चाचण्या केल्या आणि किती पॉझिटिव्ह आल्या याचं प्रमाण बघता ते 27 टक्क्यांच्या जवळ आहे. हे प्रमाण खूपच जास्त आहे. या टप्प्यात चाचण्या वाढवल्या नाहीत तर साथीतून डोकं वर येणं अवघड होईल. मृत्यूदर वाढतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल.

वारंवार दिला सल्ला, तरी अंमलबजावणी नाही

लोकसत्ताच्या बातमीनुसार, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांनीही सरकारला हाच सल्ला दिला होता. प्रत्येक प्रभागात स्वॅब गोळा करणारी केंद्र स्थापन करावीत आणि अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, असा त्यांचा सल्ला अजूनही अंमलात आलेला नाही.

महाराष्ट्रात 500 च्या वर लॅबमध्ये कोरोना चाचणीची सोय आहे, पण पुरेशा क्षमतेने या प्रयोगशाळांचा वापर करून घेतला जात नसल्याचा आरोप होत आहे. अँटिजेन टेस्ट करून तातडीने रुग्णांचं अलगीकरण आणि उपचार सुरू करावेत, तरच विषाणूचा संसर्ग कमी राहील आणि तरच विषाणू नुकसान कमी करेल. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरी RTPCR test तातडीने करायचा सल्ला देण्यात आला आहे. लवकरच्या टप्प्यात Covid-19 चा संसर्ग लक्षात आला नाही, तर रुग्ण दुप्पट होण्याच प्रमाण आणि आजाराचं गांभीर्यही वाढत जाईल. मृत्यूदरही वाढू शकतो, हाच मुद्दा चिंतेचा असल्याचं केंद्र सरकारडून महाराष्ट्राला आलेल्या पत्रात अधोरेखित करण्यात आला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 21, 2020, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading