सांगली, 25 मार्च : संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सांगलीतही संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीमुळे सर्वत्र निरव शांतता आहे. त्यामुळे अनेकजण वेळ कसा घालवायचा, या विचारात आहेत तर दुसरीकडे सांगलीच्या शिंदे कुटुंबीयांनी या संचारबंदीत बाहेरच पडायचा नाही असा निर्णय घेत एकत्र राहणे पसंद केले आहे.
शिंदे कुटुंबातील सदस्य घरगुती खेळाबरोबर एकत्र क्रिकेट खेळण्यात आपला वेळ घालवत आहेत. याचबरोबर दिवसभर कॅरम, बुद्धिबळ तसेच पुस्तक वाचनात सर्व कुटुंबातील सदस्य आपला वेळ घालवत आहेत. शिवाय रस्त्यावर न येता आपल्या घराच्या टेरेसवर या शिंदे कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा क्रिकेटचा आनंद घेऊन आपला दिवस व्यतीत करीत आहे.
शासनाच्या सूचनेनुसार आम्ही आमचे घर सोडणार नाही आणि नियमांचे पालन करू, असा निर्धार या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या सूचनेनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांसाठी हा एकप्रकारे धडाच आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशातील प्रशासनापासून ते सामान्य नागरिकापर्यंत...प्रत्येकजणच चिंतेत आहे. हा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आावाहन करण्यात येत आहे. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन टाकली आहे तर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूचना केली आहे.
राज्य सरकारने आधी संचारबंदीची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी आता पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अशातच काही बेजबाबदार नागरिक सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांचं काम काहीसं जास्तचं वाढलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.