दिनेश केळुसकर
कणकवली, 5 जुलै- मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नितेश राणेंच्या अटकेचा निषेध; कणकवलीत व्यापाऱ्यांचा बंद
आमदार नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई–गोवा हायवेच्या कामाचा जाब विचारला. शिवाय, त्यांच्या अंगावर चिखल फेक केली. याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेचा कणकवलीत व्यापाऱ्यांनी निषेध केला आहे. नितेश राणेंच्या अटकेचा निषेध करत कणकवलीतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी अटक देखील करण्यात आली असून यांच्या या कृत्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अटकेनंतर नितेश राणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या कृत्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी माफी मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही नारायण राणे यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी राज्यभर कामबंद आंदोलनाची हाक दिली. यावेळी त्यांनी प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंकडून झालेल्या मारहाणीचा निषेध केला.
बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या कारनाम्याचा पर्दाफाश