नवी दिल्ली, 5 एप्रिल : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काँग्रेसचे आमदार (Congress MLA) नाराज असल्याची चर्चा अनेकदा समोर आली आहे. यापूर्वीही अनेकदा अशा घटना समोर आल्या. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आणि आज ही भेटही घेतली. या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार केली आहे. काँग्रेस पक्षात राज्यात कुठलाही समन्वय नाही अशीही तक्रार केली. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शिवसेनेत एकनाथ शिंदे आहेत मात्र काँग्रेसमध्ये एकही मंत्री पुढाकार घेत नाही. काँग्रेस आमदाराचा निधी मिळत नाही. मंत्री फक्त आपल्या मतदार संघासाठी निधी घेतात इतर काँग्रेस आमदारांना वाऱ्यावर सोडतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी लिखित स्वरूपात देण्याचं सांगितले. विधान सभा अध्यक्षाच्या घोळा वरून सोनिया गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा : राज ठाकरेंची तोफ ठाण्यात धडाडणार, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान स्वीकारणार?
बैठक संपल्यावर आमदारांनी सांगितले की, बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सोनिया गांधी यांच्या बोलण्यातून त्यांना महाराष्ट्रातील बरंच काही माहिती आहे असं आम्हाला दिसून आलं. बैठकीनंतर आमदार म्हणाले, सोनिया गांधी यांच्यासोबत आमची चर्चा झाली. 10 मिनिटे आमची चर्चा झाली. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न आमदारांनी सांगितले, पक्षाबाबत माहिती दिली. त्यांनीही विचारपूस केली. अत्यंत चांगलं वातावरण निर्माण करण्याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलं आहे.
आम्ही सोनिया गांधी यांची भेट मागितली होती. गेल्या दोन वर्षांपासून कोविड मुळे सोनिया गांधी यांची भेट आम्ही घेऊ शकलो नव्हतो. आम्हाला वाटत होतं की, सोनिया गांधी यांना भेटावं आणि महाराष्ट्रातील परिस्थितीची कल्पना द्यावी. बरिच चर्चा झाली. सकारात्मक दृष्टीने सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील पक्ष संघटन वाढवण्यासाठी येत्या काळात काँग्रेस पक्षाकडून आणखी ठोस पावलं उचलली जातील असा आम्हाला 100 टक्के विश्वास आहे असंही आमदारांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
संग्राम थोपटे यांनी म्हटलं, भेट अतिशय चांगली झाली. सर्वच आमदारांची इच्छा होती की, भेट व्हावी. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली, त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. डिजिटल मेंबरशिप नोंदणी, पुढील निवडणुकांच्या संदर्भातील आढावा याबाबत चर्चा झाली. नाराजी अशी कुठलीच नव्हती. सोनिया गांधी भेटल्यानंतर आम्हाला आता अतिशय चांगली उर्जा काम करण्यासाठी मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Maharashtra News, Sonia gandhi