मुंबई, 15 डिसेंबर: मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात विरोधी पक्षानं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप केले. मात्र, सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोडून काढले.
सभागृहाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली. मराठा आरक्षणासाठी ओबीसींचं आरक्षण काढणार का? यावर देखील उत्तर देऊन विरोधकांना गप्प केलं.
हेही वाचा..आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांची बोलती केली बंद
मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचा आम्ही एक कणही काढणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता, तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो. नंतर सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेव्हा वकिलांची फौज तशीच्या तशी ठेवली आहे. सरकारनं भूमिकाही बदलली नाही. वेळोवेळी मराठा संघटनांसोबत चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर कायम चर्चा करत आहेत. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतो आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. ही लढाई जिंकावी, अशी माझी प्रार्थना आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, ही लढाई सुरू असताना ओबीसींचं आरक्षण काढणार का? हे मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहीत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावं लागलं. आपण टाकलं नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला.
मृतांचा आकडेवारी लवपली नाही...
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपण राबवली ती राबवणारे आपले राज्य कदाचित जगात पहिले राज्य असेल. या मोहीमेत घरोघरी जाऊन पाहणी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा आपल्याकडे तयार झाला. दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे, ती लपवलेली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मला एका गोष्टीचं वाईट वाटलं, आरोप करा, त्या आरोपांकडे पॉझिटीव्ह नजरेने आम्ही पाहतो. आपण इतर देशांचे कौतुक करतो, चीनने हॉस्पिटल उभं केलं. मग आपण केलं नाही का..? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री म्हणाले, देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ज्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केली. केंद्राने लॉकडाऊन करण्याच्या आधी आपण एक एक गोष्टी बंद करत आलो होतो.
राज्याला मातीत घालणारं राजकारण थांबवायला हवं...
कांजूरमार्ग कारशेडवर मी आता काही भाष्य करणार नाही. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तो मुद्दा अॅडमिट आहे की नाही तो मुद्दा नाही. हा विषय कोर्टात आहे, त्यावर जो काय निकाल लागायचा असेल तो लागेल. अशा प्रकल्पात तुझं माझं असं न करता, मालकी कुणाची की प्रकल्प कुणाचा हे महत्त्वाचं आहे, असं विधान कोर्टानं केलं आहे.
हेही वाचा... शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केला गंभीर आरोप
समृद्धी मार्गाबाबतही आक्षेप घेतला होता. तिथं काही ठिकाणी मार्ग बदलावा लागला. काही ठिकाणी मोबदला वाढवून द्यावा लागला. बुलेट ट्रेनसाठी मुंबईची मोक्याची जागा घेतली. बुलेट ट्रेनचा फायदा कुणाला जास्त आहे.? बुलेट ट्रेनची मोक्याची जागा आपण दिली, आपल्याला किती स्टेशन मिळणार 4, गुजरातला किती मिळणार? मुंबईवरून अहमदाबादला कोण जाणार...? त्यामुळे मिठाचा खडा टाकू नका. संपूर्ण नासून टाकायचं. राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.