मुंबई, 9 ऑगस्ट: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकटे चिरंजिव तेजसला वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे. तेजसचा 7 ऑगस्टला वाढदिवस होता. उत्तर-पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात गोगलगाईंचा अभ्यास करण्यासाठी तेजसला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी म्हणजे तेजससाठी वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा...शिवरायांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला, मराठी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
तेजसनं नुकताच उत्तर-पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगलगाईंचे संशोधन करण्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. विशेष म्हणजे तेजसच्या वाढदिवशीच त्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी तेजस ठाकरेसह अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले हे देखील जाणार आहेत.
भाजप नेत्याकडून तेजसचं कौतुक...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजिव तेजस ठाकरे यांनी गोगलगाईसंदर्भात उत्तर-पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्याबद्दल भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी तेजसचं कौतुक केलं आहे. आमदार आशिष शेलार यांनी तेजसचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.
तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच!
महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
आजोबा बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस देखील राजकारणात येईल, असा जवळपास सगळ्यांचा समज होता. कारण, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तेजस दिसला होता. मात्र, तेजस याने वेगळं क्षेत्र निवडलं आहे.
वन्यजीव म्हणजे 'वाईल्ड लाईफ' हा तेजसचा आवडीचा विषय आहे. तेजस यानं वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचं नाव दिलं आहे. 'गॅटीएना पत्रोपर्पर्रीया', 'गॅटीएना स्पेंडीटा', 'गुबरमॅतोरिएना एग्लोकी', 'गुबरमॅतोरिएना वॅगी' आणि भगव्या रंगाचा 'गुबरमॅतोरिएना थॅकरी' अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे 'ठाकरे' या आडनावावरुन देण्यात आलं आहे.
दरम्यान, तेजस यानं महिन्याभरापूर्वीच पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे. तर त्याआधी तेजस यानं सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून 'कॅट स्नेक' सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव 'बोईगा ठाकरे' असं ठेवण्यात आलं होतं.
हेही वाचा...शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण, आता भाजपने शिवसेनेवर साधला निशाणा
तेजसबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब?
तेजस याला उद्देशून हा मुलगा डॅशिंग आहे. तो काही आगळं वेगळं करून दाखवेल, असं बाळासाहेब ठाकरे आपल्या नातवाबद्दल म्हणाले होते. तेजस यानं बाळासाहेबांचे शब्द आज खरे करून दाखवलं आहे.