"कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का.."; आठवलेंना गृहमंत्र्यांच्या ‘आठवले स्टाइल’ सदिच्छा
केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांना कोरोना झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आठवलेंना त्यांच्याच स्टाइलमध्ये सदिच्छा दिल्या आहेत.
मुंबई, 28 ऑक्टोबर: कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो (Corona Go Go Corona) अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)यांना कोरोना (Corona)ची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत पण खबरदारी म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार असल्याचं ठरवलं आहे. रामदास आठवले लवकर बरे व्हावेत म्हणून त्याचे अनेक मित्र, शुभचिंतक त्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही मागे नाहीत. अनिल देशमुख यांनी रामदास आठवलेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
रामदास आठवलेंना गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्याच खास स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुखांनी आठवलेंना चारोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. “करोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा,” गृहमंत्र्यांनी केलेलं हे ट्वीट आता व्हायरल होत आहे.
'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll@RamdasAthawale लवकर बरे व्हा. 🌹
मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवले यांनी स्वतः ला होम क्वारंटाइन केलं आहे. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची सोमवारी कोरोना टेस्ट झाली होती. डॉक्टरांनुसार, त्यांची प्रकृती स्थीर आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णलयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
म्हणून घोषणा आठवली...
चीनमध्ये कोरोना आला होता, त्यामुळे 'कोरोना गो' ही घोषणा मला आठवली होती, असं रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. माझं नाव आठवले असल्याने मला योग्य गोष्टी योग्य वेळी आठवतात, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं होतं. या घोषणेमुळे माझं नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचलं असल्याचं ते म्हणाले होते.