'टीम ठाकरे'मधून पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कुणी केला कट?

'टीम ठाकरे'मधून पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कुणी केला कट?

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शिरजोर होऊ दिलं नाही.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ती केवळ चर्चाच ठरली. काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतील असतानाही  ऐनवेळी त्यांचा पत्ता का कापला गेला? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची अखेर वर्णी लागली. खरंतर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या  दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण पृथ्वीराज चव्हाणांना ठाकरे सरकारमध्ये स्थान पटकावता आलं नाही.

पृथ्वीराज चव्हाणांचा ऐनवेळी पत्ता कट होण्यामागे शरद पवारांची नाराजी आणि काही वर्षांपूर्वी कर्नाटक काँग्रेसमधील घडामोडींची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातंय.

पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी असताना मल्लिकार्जुन खरगे आणि एस.एम. कृष्णा या दोन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमधला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी कृष्णा यांना झुकतं माप दिलं होतं. आता पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपदापासून दूर ठेवून खरगे यांनी तेव्हाचा राजकीय हिशेब चुकता केल्याची चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्याचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांवर असलेली नाराजी.

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शिरजोर होऊ दिलं नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झालाय, अशी तिखट टीका शरद पवारांनी त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांवर केली होती. विशेष म्हणजे, राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाणांनी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला होता. तसंच या बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशीची परवानगीही चव्हाणांनी दिली होती.

याच प्रकरणामुळं अजित पवारांवर गुन्हा दाखल झालाय. तर शरद पवारांना ईडीनं नोटीस बजावली होती. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीलाही  पृथ्वीराज चव्हाणांनी गती दिली होती. एकीकडे पृथ्वीराज चव्हाणांवर पवारांची नाराजी  तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंशी पृथ्वीराज चव्हाणांची मैत्री आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास उद्धव ठाकरे त्यांच्या सल्ल्यानं कारभार हाकतील अशी शक्यता होती  आणि नेमकं तेचं पवारांना नको होतं. म्हणूनचं पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या  महाविकासआघाडीच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. परंतु, या शपथविधी सोहळ्यासाठी घटकपक्षांचा विसर पडला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राजू शेट्टी यांनी ट्वीट करून महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका केली आहे. "ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना सन्मानाने आमंत्रण देण्यात आलं आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वत:च नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल" असं म्हणत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली.

तसंच राज्य घटना आणि लोकशाही अढळ श्रद्धा असलेल्या छोट्या पक्षांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्याला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात मदत केली. यासाठी आम्ही महाविकासआघाडीला पाठिंबा दिला होता. पण, ज्यांनी चौकशीचा ससेमिरा मागे लावला अशांना शपथविधीला बोलावण्यात आलं. त्यामुळे निश्चितच भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

First published: December 30, 2019, 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading