पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार शक्य - सुधीर मुनगंटीवार

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार शक्य - सुधीर मुनगंटीवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या विस्तारात मंत्रिपद मिळालं तरी काम करण्यासाठी जेमतेम चार महिनेच मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 27 मे : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा जोर पकडलाय. मंत्रिमंडळातल्या काही जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे असंतुष्टांना गाजर दाखविण्यासाठी अशी खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जातंय. मात्र आता लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर अधिवेशनापूर्वी हा विस्तार नक्की समजण्यात येतो.

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काही मंत्रिपदं ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात मंत्रिपद मिळालं तरी काम करण्यासाठी जेमतेम चार महिनेच मिळण्याची शक्यता आहे.

हा मंत्रिमंडळ विस्तार 23 मे रोजी लोकसभेच्या निर्णयावर अवलंबून होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्याने राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांना मोठी खाती देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

विखे पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश?

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 30 मे रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी घडू शकतात. यातील सर्वात महत्त्वाची घडामोड असेल ती काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करु शकतील. विखे-पाटील यांच्यासोबत काही आमदार देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात त्यांच्यासोबत कोणते आमदार भाजपमध्ये जाणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी नगरमधून विजय देखील मिळवला. सुजय यांच्या प्रवेशापासून राधाकृष्ण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर नगर आणि शिर्डीची जबाबदारी दिली होती. या दोन्ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. विखेंनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळल्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश करुन त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.

राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना मंत्रिपद देखील तितक्याच तोला मोलाचे दिले जाईल, असे बोलले जाते. विखेंसोबत राज्यातील 12 आमदार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published: May 27, 2019, 5:29 PM IST

ताज्या बातम्या