मुंबई, 9 डिसेंबर : माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा (Vishnu Sawara) यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू सावरा (Vishnu Savara) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या सावरा यांचं पालघर भागात कार्यक्षेत्र होतं. त्यांनी भाजप- सेना सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात होतं. त्यात आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विष्णू सावरा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला आहे.
विष्णू सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. 1980 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भाजपमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रुजू झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख आहे. 2014 मध्ये दुसऱ्यांदा त्यांना आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याच्या कामाबरोबर त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते नागरिकांचे आवडते झाले होते. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. 1985 पुन्हा वाडा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. यातच त्यांचा पराभव झाला. मात्र तरीही त्यांचे सामाजिक काम सुरूच होते. आदिवासी समाजासाठी त्यातही तरुणांसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. आदिवासाची समाजाच्या उन्नतीसाठी ते कायम पुढाकार घेत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.