सत्ता स्थापनेच्या खेळात फडणवीस पडलेत एकटे, दिल्लीकरांचे दुर्लक्ष!

सत्ता स्थापनेच्या खेळात फडणवीस पडलेत एकटे, दिल्लीकरांचे दुर्लक्ष!

राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी भाजप-सेनेमध्ये सत्तेचा तिढा सुटत नसल्याचं दिसत आहे. एका बाजुने सेना आणि आघाडीचे नेते भूमिका मांडत असताना भाजपकडून मात्र वेट अँड व़ॉच म्हटलं गेल्यानं सरकार कसं स्थापन होणार याकडं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : मी पुन्हा येईन असा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे करत भाजपने विधानसभा निवडणुक लढवली. 2014 च्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळाल्या. सेनेसोबत निवडणुकीआधी युती केली. महायुतीला बहुमत मिळालं पण आता दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण यावरून सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावरच सरकार स्थापन करायचं अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी असं काही ठरलं नव्हतं म्हटलं होतं. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असेल तर त्यावेळी मी उपस्थित नव्हतो असंही सांगितलं होतं.

पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि तो शिवतिर्थावर शपथ घेईल असं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. 'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही.' असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

गिरीश महाजन यांना संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या पक्षाने बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. सध्या आमची वेट अँड वॉच अशी भूमिका आहे. सेनेचे नेते बोलत आहेत. त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी बोलावं आमची कोणतीही तक्रार नाही असंही महाजन यांनी म्हटलं. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकदाच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यानंतर कोणत्याच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यामुळे सत्ता संघर्षाचा हा पेच कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

'मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली'; सेनेची जहरी टीका, पाहा संजय राऊत UNCUT

राज्यातील सत्तेच्या हा संघर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपण विरोधी पक्षात राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. तरीही शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याने भाजपसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच भाजपच्या हायकमांडकडून मात्र हालचाली होत असल्याचं दिसून येत नाही. यावर संजय राऊत यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना वक्तव्य केलं होतं.

वाचा : 'शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार'

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे दिल्लीतलं नेतृत्व पुढाकार घेत नाही. त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेत्यांकडे सोपवली मात्र इथल्या नेत्यांना ती पेलत नसल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. खरंतर आतापर्यंत रावसाहेब दानवे, दिवाकर रावते, चंद्रकांत पाटील यांनी युतीचंच सरकार येईल असं म्हटलं. पण त्यानंतर सेनेकडून इतक्यावेळा भूमिका जाहिर केल्यानंतरही कोणतंच वक्तव्य भाजप नेत्यांकडून आलेलं नाही. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून अनेक नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आघाडीमध्ये काही नेत्यांनी सेनेला पाठिंबा द्यावा असाही सूर लावला आहे.

वाचा : शरद पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊत म्हणतात...

महाराष्ट्राबरोबरच हरियाणातही विधानसभा निवडणुका झाल्या. तिथेही सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. तिथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हरयाणातील प्रादेशिक पक्ष जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेतला. हरयाणात सध्या भाजपचा मुख्यमंत्री तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री आहे. याची घोषणा खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या. पण निकालानंतर मात्र असं सत्ता स्थापनेसाठी दिल्लीतून हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे दुर्लक्ष होत असून राज्यात फडणवीस एकटे पडल्याचं दिसत आहे.

सत्ता स्थापनेचा 'पॉवर गेम' राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं

VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या