महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती - पवार यांची माहिती

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती - पवार यांची माहिती

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या बैठक मुंबईत सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या बैठक मुंबईत सुरू आहे. दोन तासांनी या बैठकीतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाहेर पडले.  "मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे  यांच्या नावावर सहमती झाली", अशी मोठी बातमी शरद पवार यांनी या महाबैठकीतून बाहेर आल्यानंतर दिली. याचा अर्थ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर या बैठकीतून समोर आलं आहे. उद्धव यांनी मात्र याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. "मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ", असं उद्धव म्हणाले.

सत्तास्थापनेविषयीचे सविस्तर निर्णय ठरल्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ, असं पवार म्हणाले. दरम्यान सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना उद्याच जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय संमती मिळाली, असं शरद पवार म्हणत असले, तरी स्वतः उद्धव यांचा निर्णय झाला की नाही, हे स्पष्ट नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव यांनाच मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली. पण उद्धव विचार करून सांगणार, असं म्हणाल्याची सूत्रांची माहिती आहे.

संबंधित - महाविकास आघाडीची महाबैठक: अद्याप संपूर्ण निर्णय नाहीच! उद्धव - पवार म्हणाले...

या बैठकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीतील नेते मलिक्कार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

संबंधित - ही महाआघाडी टिकणार नाही, सत्तास्थापनेआधीच गडकरींनी वर्तवली भविष्यवाणी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सत्तास्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झालं. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आघाडीच्या सत्तास्थापनेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होत आहे.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

महाविकास आघाडीच्या या बैठकीत खातेवाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष पहिल्यांदाच सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे मंत्रिपद आणि सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर आजच्या मॅरेथॉन बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

वाचा - पाकिस्तानी Whatsapp ग्रुपमध्ये भारतीय सैन्याधिकारी, लष्कराने जारी केला अलर्ट

या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडी सरकारचा पहिला मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत खलबतं होण्याची शक्यता आहे. आघाडीतील सर्व पक्षांना मान्य असा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच जाईल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेनेतून स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार की इतर कुणाचं नाव समोर येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या मुंबईतच असणार आहेत. राज्यपालांनी आजचा दिल्ली दौरा केला रद्द होता. मात्र उद्या राज्यपाल मुंबईत आहेत की नाहीत याविषयी संभ्रम होता. तो संभ्रम आता दूर झाला आहे. राज्यपाल उद्या मुंबईतच असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या