मुंबई, 27 डिसेंबर: मुंबईत विधान भवनात (Vidhan Bhavan) सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (winter session) 35 जणांची (tested positive for Covid 19) कोविड 19 संसर्ग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवारी हा आकडा 32 होता. तो आता वाढून 35 वर पोहोचला आहे. 2300 जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने चिंता व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर काही आमदार आणि मंत्र्यांचे पी ए देखील आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह आलेले हे सर्व 35 जण गेल्या आठवड्यात विधिमंडळात किती जणांच्या संपर्कात आले होते. तसेच त्यांचा वावर विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात किंवा त्यांच्या जवळ होता का याचा तपास आता आरोग्य विभाग घेत असल्याची माहिती मिळतेय. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज किंवा उद्या विधान भवनात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
हेही वाचा- स्वत:ला विविध कामात गुंतवून घेणं यासाठी आहे गरजेचं; या गंभीर आजाराचा धोका होतो कमी
मात्र जर विधान भवनातील परिसर मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग विधिमंडळात पॉझिटीव्ह आलेल्या 35 जणांचा वावर कुठे कुठे होता याचा तपास करत असल्याची माहिती मिळतेय.
जर का यापैकी कुणाचाही वावर विधान भवनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालय तसेच येण्या-जाण्याच्या मार्गावर असेल तर आरोग्य विभाग त्या संदर्भात आजच मुख्यमंत्री कार्यालयाला सतर्क करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांसह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सर्व गोष्टींची खबरदारी घेण्यात आली होती. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तीच घटना अखेर घडली आहे. अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अधिवेशनासाठी काम करणाऱ्या 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी थेट विधान भवनात फिल्डिंग, अटकेची टांगती तलवार
खरंतर हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांमध्ये होतं. पहिल्या आठवड्यात तीन दिवस आणि येणाऱ्या आठवड्यात दोन दिवस, असा कालावधी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेला होता. दोन्ही आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी बंधनकारक आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणारे सर्व आमदार, मंत्री, सरकारी कर्मचारी, पोलीस, पोलीस अधिकारी आणि पत्रकार या सर्वांची कोरोना चाचणी दोन्ही आठवड्यात केली गेली. दोन दिवसात या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये काही पोलीस, सरकारी कर्मचारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. पण एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.