अमित शहांबरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राबद्दल नेमकं काय घडलं? वाचा INSIDE STORY

अमित शहांबरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राबद्दल नेमकं काय घडलं? वाचा INSIDE STORY

लोकसभेच्या घवघवीत यशानंतर भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. तर विरोधक पराभवातून सावरलेले नाहीत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 10 जून : लोकसभेच्या घवघवीत यशानंतर भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन यशाचा कानमंत्र दिला. यानंतर भाजपने राज्यातल्या एकूण 288 विधानभा जागांपैकी तब्बल 228 जागांचं टार्गेट ठेवलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 228 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि सेनेला आघाडी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा राखा असे आदेशच अमित शहा यांनी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना दिले आहेत. या आधीच्या सर्वच निवडणुकींमध्येही अमित शहा यांनी अशाच प्रकारचं टार्गेट ठेवून रणनीती आखली होती.

त्यामुळे भाजपचे नेते आता जोमाने कामाला लागले आहेत. आम्ही आता विधानसभा निवडणुकीच्या मिशन मोडमध्ये आलो असून आजपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे असं मत फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत व्यक्त केलं होतं.

भाजपचे जास्तित जास्त उमेदवार निवडून आणणार आहोत. त्याचबरोबर मित्रपक्षांचेही जास्तित जास्त उमेदवार कसे निवडून येतील याची काळजी भाजपचे कार्यकर्ते घेतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर टाकली आहे.

तर पराभवामुळे खचलेले विरोधी पक्ष अजून सावरलेले नाहीत. राष्ट्रवादीने मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तर काँग्रेसमध्ये अजुन शांतताच आहे. विरोधकांच्या यास्थितीचाही फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

पवारांनी केलं स्वयंसेवकांचं कौतुक, काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संघ स्वयंसेवकांचं कौतुक केलं होतं. संघाच्या स्वयंसेवकांची चिकाटी अंगी बाणवा असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावर सोशल मीडियावरून चांगलीच चर्चा रंगली होती, शरद पवारांवर टीकाही झाली होती.

या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शरद पवार यांची स्वतःची चिकाटी काही कमी नाही. अर्थात चांगल्या गोष्टीची दाद देण्यात काहीही गैर नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. या सरकारला सामान्य माणसांच्या सुख दु:खाशी काहीही देणं घेणं नाही अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले होते शरद पवार?

कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात पवार म्हणाले होते की, संवादात संघ स्वयंसेवकांचा हात कुणी धरू शकत नाही. ते चिकाटीने पाठपुरावा करतात. सकाळी कुणी भेटलं नाही की ते संध्याकाळी जातात पण त्यांची भेट घेतल्याशीवाय राहत नाही. कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी पवारांनी हे उदाहरण दिलं होतं.

First published: June 10, 2019, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading