'भाजपनं माझं तिकीट का कापलं असावं?' विनोद तावडेंनी व्यक्त केली खंत

'भाजपनं माझं तिकीट का कापलं असावं?' विनोद तावडेंनी व्यक्त केली खंत

पक्षाने तिकीट नाकारूनही विनोद तावडे मोठ्या उदार अंतकरणाने भाजपच्या प्रचाराला लागलेत खरे पण अजूनही ते आपलं तिकीट का कापलं असावं याचीच उत्तरं शोधत आहेत.

  • Share this:

दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 10 ऑक्टोबर: विधानसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनेकांची उमेदवारी नाकारून आयारामांना संधी दिली आहे. यामुळे अनेक मतदारसंघामध्ये नेत्यांनी बंड पुकारलं होतं. मात्र भाजपने त्यांच्यावर प्रचाराची धुरा देत बंड थंड केलं आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केला आहे.

पक्षाने तिकीट नाकारूनही विनोद तावडे मोठ्या उदार अंतकरणाने भाजपच्या प्रचाराला लागलेत खरे पण अजूनही ते आपलं तिकीट का कापलं असावं याचीच उत्तरं शोधत फिरताना दिसत आहेत. सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या प्रचारासाठी आल्यानंतरही विनोद तावडेंनी ही खंत पुन्हा बोलून दाखवली.

वैभववाडी तालुका म्हणजे विनोद तावडेंच्या मामाचं गाव. याच गावात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी विनोद तावडे आणि प्रवीण दरेकर हे भाजपा नेते दाखल झाले आणि त्यांनी नितेश राणेना भरघोस मतानी निवडून द्यावं असं आवाहन केलं. पण तावडे हे देखील सिंधुदुर्गाचेच सुपुत्र असल्यामुळे खुद्द त्यांनाच भाजपाने तिकीट नाकारल्याची खंत भाजपाच्या स्थानिक नेत्यानी बोलून दाखवली.

कदाचित हीच खंत विनोद तावडेनाही असल्यामुळे ते अजूनही आपलं तिकीट का कापलं याचं उत्तर शोधत फिरत आहेत. त्यासाठी आपण बोरीवलीत कशी माणसं जोडली याचीही भन्नाट उदाहरणं संधी मिळेल तिथं सांगत सुटत आहेत.

असं एकेक मत पक्षासाठी जोडूनही आपला पत्ता नेमका कोणी आणि कसा कट केला याचं उत्तर काही तावडेंना अजून मिळालं नाही. पण तरीही विनोद तावडे नितेश राणेना जिंकून देण्यासाठी मतं मागत फिरत आहेत. विशेष म्हणजे भाजपनेही सेनेच्या विरोधात नितेश राणेंना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी तावडेंवरच टाकली आहे. कदाचित यालाच तर भाजपचं शिस्तबद्ध राजकारण म्हटलं जात असावं. विनोद तावडेंना किमान भाजप विधानपरिषदेत संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या