सागर सुरवसे (प्रतिनिधी)सोलपूर, 09 ऑक्टोबर: दोन दशकांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेचं कारण ठरलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेंनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचं केलेलं भाकीत .
लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात काँग्रेस गलितगात्र झाली आहे. नेत्यांच्या गळतीमुळं तर राज्यात दोन्ही काँग्रेसला आस्तित्वाची लढाई लढावी लागते आहे. सध्या
काँग्रेसला राज्यात मोठं नेतृत्व उरलं नाही. तर तिकडे दुसऱ्या फळीतील नेते असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना वयाच्या ७८ व्या वर्षी प्रचारासाठी फिरावं लागतं आहे.
बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळचं दोन्ही काँग्रेसचे नेते आता जमिनीवर आलेत. आणि त्यामुळचं काँग्रेस-राष्ट्रवादीत पहिल्यांदाचं विधानसभेच्या जागांचं सम-समान वाटप झालं. बदलेली राजकीय परिस्थितीत पाहाता काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनिकरण हाच रामबाण उपाय असल्याची जाणीव काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांना झालीय.लवकरचं हे विलीनीकरण होईल असं भाकित काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेंनी केलं.
१९९९ मध्ये काँग्रेसला रामराम करुन शरद पवारांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. त्यानंतर सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसनं गळ्यात गळे घालतं सरकार स्थापन केलं. सत्तेत एकत्र असतानाही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्हीकडच्या नेत्यांना सोडली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री निवडतांना काँग्रेस हायकमांडनं पवार विरोधकाला पसंती दिली. मात्र २०१४मध्ये मोदींच्या वादळाचा दोन्ही काँग्रेसला तडाखा बसला. २०१९ येईपर्यंत तर सगळं चित्रचं बदलून गेलं आहे. दरम्यान राज्यात भाजप-सेनेनं युतीचा खुंटा बळकट केला. युतीचा सामना करायचा असेल तर दोन्ही काँग्रेसनं एकत्र येणं आवश्यक असल्याची जाणीव आता काँग्रेसला झाली. मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे? याचा अंदाज भल्या-भल्यांना लावता आला नाही. सत्ता संघर्षातूनचं राष्ट्रवादीची निर्मिती झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं सुशिलकुमारांचं भाकित खरं ठरणार का हाच खरा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.