कोकणात निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा... शिवसेनेच्या या मंत्र्यावर जादूटोणा केल्याचा आरोप

कोकणात निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा... शिवसेनेच्या या मंत्र्यावर जादूटोणा केल्याचा आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असताना कोकणात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे,(प्रतिनिधी)

दापोली, 11 सप्टेंबर: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असताना कोकणात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम हे भगतगिरी करत असून जादूटोणा करण्यासाठी बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात, असा आरोपी सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला होता. विरोधीपक्ष नेतेपदासाठी कदम यांनी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असेही दळवी सांगितले होते.

सूर्यकांत दळवी यांच्या हकालपट्टीची मागणी करणार- रामदास कदम

दरम्यान, कोकणात निवडणुकी पूर्वीच कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम विरुद्ध माजी आमदार सूर्यकांत दळवी या दोन नेत्यातील वाद विकोपाला गेला आहे. रामदास कदम हे दापोली दौऱ्यावर आले असता त्यांनी दळवींवर पलटवार केला आहे. दळवी यांची सेनेतून हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.

सूर्यकांत दळवी यांनी माझी बदनामी करण्यासाठी पत्रकार परिषदेत मी जादूटोणा करत असल्याचे सांगितले आहे. त्यांचे हे विधान मी गांभीर्याने घेतले असून लवकरच त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी आपण पक्ष श्रेष्टीकडे करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. कावीळ झालेल्या माणसाला जग नेहमी पिवळे दिसते. त्याप्रमाणे सुर्यकांत दळवी यांचे झाले आहे. त्यांना सध्या सगळीकडे रामदास कदम दिसत आहेत. माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल दळवी यांच्यावर आपण 10 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचेही कदम यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते सूर्यकांत दळवी?

रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावाले आहेत. ते दर अमावस्येला भगतगिरी करत असतात. ते बंगाली बाबांना घेऊन फिरतात. त्यांनी विरोधीपक्ष नेता बनण्यासाठी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असा गंभीर आरोप दळवी यांनी केला. तसेच कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, असेही ते म्हणाले होते. कदम यांनी पक्षाच्या विरोधातही काम केले असून त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा दळवी यांनी केला. या मतदारसंघात पक्षासाठी योगदान देणाराच उमेदवार हवा. कदम यांनी पराभव झालेल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, असे दळवी यांनी स्पष्ट केले होते.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 01:11 PM IST

ताज्या बातम्या