शिवसेना खासदाराच्या मुलानेच केली पक्षाविरुद्ध बंडखोरी, डोकेदुखी वाढणार

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 08:50 AM IST

शिवसेना खासदाराच्या मुलानेच केली पक्षाविरुद्ध बंडखोरी, डोकेदुखी वाढणार

मुंबई, 5 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युतीची स्थिती मजबूत दिसत होती. मात्र तिकीटवाटपानंतर दोन्ही पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.

तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपमध्ये नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट धरली तर काहींनी अपक्ष लढणं पसंत केलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीरामपूरमध्ये शिवसेनेच्या खासदारपुत्रानेच बंडखोरी केली आहे.

शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांनी पक्षाकडे श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना डावलून नुकताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या चेतन लोखंडे यांनी श्रीरामपूरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

बंडखोरांनी वाढवली युतीची डोकेदुखी

मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे. कणकवलीमध्ये भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कोकणातल्या कणकवलीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगाणार आहे. अखेरच्या दिवशी भाजपने नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला. राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र 'युती' तुटल्यातच जमा आहे. कारण भाजपचे उमेदवार असलेले नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी राणेंना पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेने सतीश सावंत यांना पाठिंबा देत AB फॉर्म दिलाय. AB फॉर्म दिल्यामुळे ते सेनेचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीच राणेंच्या स्वाभीमान पक्षातून बाहेर पडले होते. त्यामुळे ही लढत चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

Loading...

हिंगोलीत शिवसेनेच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात शिवसेनेचे संतोष बांगर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. भाजपने या मतदार संघात मोठी शक्ती वाढवली होती. यामुळे कळमनुरी भाजपला सोडावे अशी मागणी केली जात होती . मात्र ही जागा सेनेला दिल्याने नाराज भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी बंडखोरी करत एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे भाजपशी बंडखोरी जरी केली तरीही या शक्तिप्रदर्शनात बंडखोरांनी चक्क भाजपचे झेंडे फडकवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुहागरमध्ये भास्कर जाधव अडचणीत

गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी बंडखोरी केली आहे. रामदास राणे यांनी गुहागरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे नुकतंच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधव यांची डोकेदुखी वाढली आहे.

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांचा मनसेला पाठिंबा

घाटकोपरमधून भाजपने पुन्हा एकदा राम कदम यांना तिकीट दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. 'उद्धवजी आम्हाला माफ करा, या मतदारसंघात आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला मदत करू,' अशा आशयाचे पोस्टर्स शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते.

एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीतून झालेल्या मोठ्या इनकमिंगनंतर भाजप आणि शिवसेनेत उत्साहाचं वातावरण होतं. मात्र आता अनेक मतदारसंघात बंडखोरांनी डोकं वर काढल्याने युतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

VIDEO : बंडखोरांना जागा दाखवू, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...