...म्हणून विजय मिळवूनही विखे पाटील गेले बॅकफूटवर

...म्हणून विजय मिळवूनही विखे पाटील गेले बॅकफूटवर

जिल्ह्यात विखे-थोरात यांच्यात वरचढ कोण ठरेल याची चर्चा होती. अखेर थोरातांनी आपणच किंगमेकर असल्याचं सिद्ध केलं आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, 25 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात महाआघाडीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीच्या सात विद्यमान आमदारांना पराभवाला सामोर जाव लागलं. भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला गड राखला. मात्र असं असलं तरीही जिल्ह्यातून आपण काँग्रेस-राष्ट्रवादी हद्दपार करू, असा दावा करणाऱ्या विखे पाटलांना या निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात असलेले वैभव पिचड, पालकमंत्री राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डीले या विद्यमान आमदारांना तर शिवसेनेचे एकमेव आमदार असलेल्या विजय औटी यांना आपला गड राखता आला नाही. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे हेदेखील पराभूत झाले आहेत.

शिवसेनेला शिर्डी लोकसभेचा खासदार निवडून आणण्यात यश आलं होतं. मात्र शिवसेना विधानसभेला नगर जिल्ह्यात खातंही उघडू शकलेली नाही. जिल्हयात अनेक धक्कादायक निकाल पाहण्यास मिळाले. जिल्हयात विखे-थोरात यांच्यात वरचढ कोण ठरेल याची चर्चा होती. अखेर थोरातांनी आपणच किंगमेकर असल्याचं सिद्ध केलं आहे.

अकोलेत भाजपचे वैभव पिचड यांचा 57 हजारांनी झालेला पराभव तर श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयात थोरात आणि ससाणे गटाचा मोलाचा वाटा होता. याउलट राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा करिष्मा चालू शकला नाही. कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरीत विखेंची ताकद असताना तेथील महायुतीचे उमेदवार त्यांना निवडून आणता आले नाहीत.

नगर जिल्हयात 12/0 असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करू, असा विश्वास व्यक्त करणा-या विखेंना निवडणुकीत मात्र अपयश आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा मताधिक्याने विजय झाला असला तरी इतर उमेदवार पराभूत झाल्याचं शल्य त्यांनी बोलून दाखवलं आहे.

दुसरीकडे, चुकीचे सर्व्हे करणाऱ्या एजन्सीजवर आगपाखड करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बदनामी करणाऱ्या सर्व्हे एजन्सीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. एकंदरीत नगर जिल्हयात राष्ट्रवादीचा मोठा करिष्मा दिसला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांचा फायदा राष्ट्रवादीला मिळाला. राष्ट्रवादीला सहा तर काँग्रेसला दोन अशा एकूण आठ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

अंतिम निकाल : अहमदनगर जिल्हा

कर्जत जामखेड -

▪रोहित पवार - राष्ट्रवादी - 1,35,824

▪राम शिंदे - भाजप - 92,477

राष्ट्रवादीचे रोहित पवार 43,347 मतांनी विजयी

नगर शहर-

▪संग्राम जगताप - राष्ट्रवादी - 81,217

▪अनिल राठोड - शिवसेना - 70,078

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 11,139 मतांनी विजयी

पारनेर -

▪निलेश लंके - राष्ट्रवादी 1,39,963

▪विजय औटी - शिवसेना - 80,125

राष्ट्रवादीचे निलेश लंके 59,838 मतांनी विजयी

श्रीगोंदा -

● बबनराव पाचपुते - भाजप - 1,03,258

● घनश्याम शेलार - राष्ट्रवादी - 98,508

भाजपचे बबनराव पाचपुते 4750 मतांनी विजयी.

राहुरी -

▪प्राजक्त तनपुरे - राष्ट्रवादी - 1,09,235

▪शिवाजी कर्डीले - भाजप - 85,908

राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 23,327 मतांनी विजयी

शेवगाव -

▪मोनिका राजळे - भाजप 1,12,509

▪प्रताप ढाकणे - राष्ट्रवादी 98,215

भाजपच्या मोनिका राजळे 14,294 मतांनी विजयी

नेवासा -

▪शंकरराव गडाख - अपक्ष - 1,16,943

▪बाळासाहेब मुरकुटे - भाजप - 86,280

अपक्ष शंकरराव गडाख 30,663 मतांनी विजयी

श्रीरामपूर -

▪लहू कानडे - कॉग्रेस - 93,906

▪भाऊसाहेब कांबळे - शिवेसना - 74,912

कॉग्रेसचे लहू कानडे 18,994 मतांनी विजयी

कोपरगाव -

▪आशुतोष काळे - राष्ट्रवादी- 87,566

▪स्नेहलता कोल्हे - भाजप - 86,744

राष्ट्रवादीचे आशुतोष काळे 822 मतांनी विजयी

शिर्डी -

▪राधाकृष्ण विखे - भाजप - 1,32,316

▪सुरेश थोरात - कॉग्रेस - 45,292

भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 87,024 मतांनी विजयी

संगमनेर -

▪बाळासाहेब थोरात - कॉग्रेस - 1,25,380

▪साहेबराव नवले - शिवेसना - 63,128

कॉग्रेसचे बाळासाहेब थोरात 62,252 मतांनी विजयी

अकोले -

▪किरण लहामटे - राष्ट्रवादी 1,13,414

▪वैभव पिचड - भाजप - 55,725

राष्ट्रवादीचे किरण लहामटे 57,689 मतांनी विजयी

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या