सातारा, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण त्याचवेळी सातारा लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीकडेही राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना सातारा जिल्ह्यातील सर्वच निकालांना वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजनीमुळे सर्वच निकालांना वेळ लागणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निकाल आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी किमान 12 तासापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात कधी होणार मतमोजणीला सुरुवात?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला धोबीपछाड देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.
VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी