राष्ट्रवादी सोडलेल्या माजी मंत्र्याला मोठा धक्का, 40 वर्षांचा गड उद्ध्वस्त

राष्ट्रवादी सोडलेल्या माजी मंत्र्याला मोठा धक्का, 40 वर्षांचा गड उद्ध्वस्त

राष्ट्रवादी सोडलेल्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवण्याचा निश्चय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.

  • Share this:

अकोले, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अभूतपूर्व पक्षांतर पाहायला मिळालं होतं. राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी सोडलेल्या या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवण्याचा निश्चय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर आता नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आला आहे.

गेल्या 40 वर्षांपासून अकोले हा मधुकरराव पिचड यांचा गड होता. मात्र राष्ट्रवादीकडून अनेक मोठी मंत्रिपदे भूषवलेल्या मधुकर पिचड यांनी मुलगा आणि अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्यासह निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने वैभव पिचड यांना अकोलेतून उमेदवारीही दिली होती. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पिचडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला आहे.

काय होता शरद पवारांचा प्लॅन पलटवार?

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चितपट करून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आघाडीचा प्रयत्न होता. मात्र सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चिंता निर्माण झाली. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली.

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपच्याच शैलीचा अवलंब केला.

राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी करण्यात आली. तसंच त्या त्या मतदारसंघातील तरूण नेतृत्वाला राष्ट्रवादीने मोठी ताकद दिली. परिणामी, राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना धक्का बसल्याचं चित्र आहे.

LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading