पुणे, 15 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (14 सप्टेंबर) पुण्यात पार पडली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा निघाली. या पार्श्वभूमीवर सर्व मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. यानंतर रविवारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस पत्रकारांनी मेगाभरतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं आहे. आता कुठे-कुठे मेगाभरती होणार आहे? असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की, 'आता कोणतीही मेगाभरती नाहीय. पण भरती नक्कीच आहे'.
शरद पवारांवर खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, 'पवार दौऱ्यावर जात आहेत, चांगली गोष्ट आहे. जी द्राक्ष मिळत नाहीत ती आंबट म्हणण्याची राष्ट्रवादीची रीतच आहे. शिवस्वराज्य यात्रा उदयनराजे भोसलेंनी करावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे पुन्हा लोकसभेसाठी निवडणूक लढवतील. मोठ-मोठे नेते भाजपामध्ये येत आहेत, हे लक्षण चांगलं आहे', असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.
बारामतीत कलम 370 कलम आहे का?
बारामतीत महाजनादेश यात्रेदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? बारामतीत काय कलम 370 लागू आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.
(वाचा :मोदींना विजयी करणाऱ्या या 'चाणक्य'ने आदित्य ठाकरेंबाबत दिले होते हे संकेत)
(वाचा : रोहित पवारांचा 'टि्वटर' वार.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरुन मोदींना लगावला टोला)अनधिकृत होर्डिंगुळे पुणेकरांना मनस्ताप, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी
मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले होते. पण यातले अनेक होर्डिंग आणि फ्लेक्स अनधिकृत होते. याबाबतही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. यावर होर्डिंग लावणं चुकीचं असून होर्डिंग लावल्यानं कोणालाही तिकीट मिळत नाही. तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. शहरात भर रस्त्यावरच अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभी करण्यात आल्यानं पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला या होर्डिंग्जच्या अडथळ्याला सामोरं जावं लागलं. याचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकानं काढला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त केली.
(पाहा : VIDEO: अनधिकृत होर्डिंग्ज पुणेकरांना मनस्ताप; वाहतूक कोंडीत अॅम्ब्युलन्स अडकली)वृक्षतोडीवर वाद
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या यात्रेसाठी झाडे तोडल्यानं वाद निर्माण झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, एकही झाड तोडलं गेलं असेल तर कारवाई निश्चित केली जाईल. तसंच आरे वृक्षतोडीसंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही यावेळेस त्यांनी सांगितलं.
VIDEO: 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.