लढत विधानसभेची : पालघरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारावर लक्ष

लढत विधानसभेची : पालघरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारावर लक्ष

पालघर मतदारसंघात सध्यातरी शिवसेनेचं वर्चस्व आहे. आता या निवडणुकीत उमेदवारी कुणाला मिळते यावर इथली लढत अवलंबून आहे.

  • Share this:

पालघर, 17 सप्टेंबर : पालघर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे पण तरीही इथे उमेदावारीवरून जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे, असं म्हटलं जातं.

2014 मधे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले कृष्णा घोडा यांनी राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. पण त्यानंतर कृष्णा घोडा यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे इथे पोटनिवडणूक झाली.

शिवसेनेने या निवडणुकीत कृष्णा घोडा यांचा मुलगा अमित घोडा यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी इथे मोठी ताकद पणाला लावली. या पोटनिवडणुकीत भाजपनेही शिवसेनेला पाठिंबा दिला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही अमित घोडा यांच्या प्रचारासाठी आले होते. या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि आता शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांचा त्यांनी पराभव केला.

असं असलं तरी विद्यमान आमदार अमित घोडा यांची कामगिरी समाधानकारक नाही. पालघरमधले मतदारही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे शिवसेना इथून दुसऱ्या कुणाला तरी उमेदवारी देऊ शकते.

लढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का?

पालघर लोकसभेसाठी शिवसेनेने काँग्रेस, भाजप असा प्रवास करून सेनेत आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांचं नाव मागे पडलं होतं. आता विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. पण त्याचवेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक वैदेही वाढणे यांचंही नाव चर्चेत आहे.

काँग्रेस ,राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी यांची युती होणार की हे पक्ष वेगळे लढणार हे अजून ठरलेलं नाही पण माजी खासदार दामोदर शिंगडा यांचा मुलगा सचिन शिंगडा हे आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. बहुजन विकास आघाडीकडून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचं नाव आघाडीवर आहे.

पालघर मतदारसंघात सध्यातरी शिवसेनेचं वर्चस्व आहे. आता या निवडणुकीत उमेदवारी कुणाला मिळते यावर इथली लढत अवलंबून आहे.

पालघर विधानसभा पोटनिवडणुकीतलं मतं

अमित घोडा, शिवसेना - 68 हजार 181

राजेंद्र गावित, काँग्रेस - 48 हजार 181

मनीषा निमकर, बहुजन विकास आघाडी - 36 हजार 781

=====================================================================================

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

First published: September 17, 2019, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading