राणाजगजितसिंह पाटलांचं ठरलंय? राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर

राणाजगजितसिंह पाटलांचं ठरलंय? राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर

पाटील पितापुत्राच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 26 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उस्मानाबादमध्ये पोहोचली आहे. मात्र यावेळी उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे मात्र या यात्रेला अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे पाटील पितापुत्राच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे.

उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्याशिवाय राष्ट्रवादीचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे या दोघांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे का, याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती. त्यानंतर आता पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील दोघेही राष्ट्रवादीच्या यात्रेला गैरहजर राहिल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, सचिन अहिर या बड्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. तसंच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईक हेदखील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अडचणीत आली आहे.

दरम्यान, नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचीच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या