• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल?

पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल?

पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या निकालामध्ये आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला खातं उघडणं कठीण असून शिवसेनेला मोठा दणका बसला आहे.

 • Share this:
  अहमदनगर, 24 ऑक्टोबर : नगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 जागांवर सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर युती फक्त तीन ठिकाणी आघाडीवर आहे. नगरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. इथं निवडणुकीआधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल असं म्हटलं जात होतं. तर विखे पाटील यांनीही जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र अकरा वाजेपर्यंत हाती आलेला निकाल पाहता युतीला नगरमध्ये धक्का बसल्याचं चित्र आहे. 2009 मध्ये नगर जिल्ह्यातील 7 जागा आघाडीकडे तर 5 जागा युतीकडे होत्या. 2014 च्या निवडणुकीत आघाडीची एक जागा कमी झाली. काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत अहमदनगरमधील 12 पैकी 6 जागा युतीने तर 6 जागा आघाडीने जिंकल्या होत्या. आता विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस राष्ट्रवादीला दणका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 8 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर युतीला तीन जागी आघाडी मिळाली आहे. एका जागेवर इतर पक्षाचा उमेदवार पुढे आहे. नगरशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात युतीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या राजकीय गणितांचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये कडवी झुंज बघायला मिळत आहे. तर कागलमध्ये युतीला बंडखोरीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 10 पैकी फक्त एका जागेवर युती पुढे असून बाकी जागांवर इतर आणि आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. यात जनसुराज्यच्या दोन तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 जागांचा समावेश आहे. आघाडीवर आहे. तर 5 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी पुढे आहे. 2014 मध्ये 10 पैकी 6 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. यावेळी शिवसेनेला गड राखणं कठीण दिसत आहे. शाहुवाडी आणि राधानगरी मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. साताऱ्यातही लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पिछाडीवर आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर असून त्यांच्या विजयाची शक्यता आहे. अखेरच्या टप्प्यात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनं पश्चिम महाराष्ट्रातील चित्र बदलल्याचं दिसत आहे. तर कराडमधून पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत. याशिवाय सांगलीतही जयंत पाटील आघाडीवर असून जत मतदार संघातून विक्रम सावंत आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीत काय झालं? 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या. LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले
  First published: