पिंपरी चिंचवड, 18 जुलै : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यानतंर आता पार्थ पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतची चर्चा सुरू झाली. याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पक्षात बळजबरी करत नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी पार्थच्या विधानसभा लढवण्याबाबत थेट भाष्य करणं टाळलं आहे.
'लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आता विधानसभेच्या तयारी सुरू झाली आहे,' असंही अजित पवार म्हणाले. 'विधानसभा जागा वाटपाबाबत आघाडीत फार काही अडचण येणार नाही. सकारात्मक चर्चा झाली आहे. काही जागांची अदला-बदल होईल,' अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
'सत्तेत राहून मोर्चे काढायची गरज काय? मंत्रिमंडळ बैठकीत गप्प बसतात. तिथे दातखिळी का बसते? हिंमत होती तर विधानसभेवर मोर्चा काढायचा होता. बाहेर आंदोलन हा केवळ दिखावा आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेनं पीकविमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्च्यावर जोरदार टीका केली आहे.
'चाकणप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट'
'चाकण दंगल प्रकणी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. कुणालाही टार्गेट करू नका, वातावरण चिघळयाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य दिशेने तपास व्हायला अशी मागणी केली आहे,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
भात लावणीचा आधुनिक मुळशी पॅटर्न काय आहे? पाहा SPECIAL REPORT