मुंबई, 15 जुलै : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभेतील मोठ्या पराभवानंतर कमबॅक करण्यासाठी काँग्रेसनं राज्यातील नेतृत्वात बदल केला. त्यानंतर आता भाजपही आपल्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच आता अनेक नेत्यांची नावं प्रदेशाध्यपदासाठी समोर येत आहेत. यामध्ये सध्या इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी आघाडी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांच्या गळात भाजपच्या प्रदेशाध्यपदाची माळ पडणार का, हे पाहावं लागेल.
दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.
दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये आता आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावाचीही भर पडली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपकडून त्या तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी भाजप कुणाला संधी देतं, हे आता पाहावं लागेल.
VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड