भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंना मोठा धक्का

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंना मोठा धक्का

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

संदीप राजगोळकर, सातारा, 21 सप्टेंबर : साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला.

उदयनराजे भोसले यांनी प्रवेशावेळी भाजपसमोर काही अटी ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी असा आग्रह उदयनराजेंनी धरला होता. आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे. मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. त्यामुळे उदयनराजेंना हा धक्का मानला जात आहे.

उदयनराजेंच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सज्ज

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही आतापासूनच उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

उदयनराजेंना पराभवाची भीती?

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द शरद पवारांनी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली होती.

SPECIAL REPORT : अमोल कोल्हेंनी मोदींची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला

Published by: Akshay Shitole
First published: September 21, 2019, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading