मुंबई, 11 नोव्हेंबर : सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनला सत्तास्थापना करणं शक्य नाही. निर्णायक बैठकीनंतर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास आग्रही आहे. मात्र राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता काँग्रेसचं नेतृत्व मात्र अद्यापही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झालं नसल्याचं दिसत आहे. त्यातच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे गांधी परिवारातील तीनही नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यास फारसे इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात स्थापनेच्या 3 शक्यता आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी सर्वप्रथम संधी दिली. शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेस असमर्थता व्यक्त करत भाजपने संधी नाकारली. त्यानंतर आता शिवसेनेला राज्यपालांनी विचारलं आहे. शिवसेनेला आपला निर्णय संध्याकाळी 7.30 पर्यंत राज्यपालांना कळवायचा आहे. शिवसेनेपुढे आता दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याशिवाय गत्यंतर नाही. सेनेबरोबर वाटाघाटी सुरू होण्याअगोदरच दोन्ही काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
1. महाशिवआघाडी : तिन्ही पक्षांचं एकत्र सरकार
उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. पण दोन्ही नेत्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची ठोस माहिती नाही. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहात असल्याचं समजतं. तेव्हा काँग्रेसचा निर्णय सकारात्मक आला तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसह सरकार स्थापनेचा दावा करू शकते. मग मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल तर महत्त्वाच्या खात्यांसाठी तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होऊ शकतात.
2. शिवसेनेला बाहेरून पाठिंबा
सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायची बहुतेक काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. तसं पत्रही हायकमांडकडे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी सोपवलं आहे. पण सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेसने बाहेरून पाठिंब्याचा निर्णय घेतल्यास आणि राष्ट्रवादीनेही तशी तयारी दर्शवल्यास शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. पण पाठिंबा काढून घ्यायची टांगती तलवार सतत शिवसेनेवर राहील.
3. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवणार
शिवसेना सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ जमवण्यास असमर्थ ठरली तर खरा पेच निर्माण होईल. बरोबर 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारमधून फुटून स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस आघाडी सरकारमधून 40 आमदारांसह बाहेर पडून शरद पवार पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्याची आठवण देणारी परिस्थिती निर्माण व्हायला पुरेसा वाव आहे.
सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा