हरिष दिमोटे, अहमदनगर, 29 मे : काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाला वेग आहे. विखे यांच्यासह काँग्रेसमधील आणखी काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कारण अब्दुल सत्तार यांच्यापाठोपाठ मानखटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राधाकृ्ष्ण विखेंची भेट घेतली आहे.
जयकुमार गोरे यांनी संगमनेर शहरात विखेंची भेट घेतली. तसंच भेटीनंतर एकाच गाडीतून दोघांनी प्रवास केला. दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वीच अब्दुल सिल्लोडचे सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे हे दोन्हीही आमदार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मोदींच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असंही महाजनांनी यावेळी सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटलांनी गिरीश महाजनांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
'माझे वडील माझ्या सोबत येतील याचा आनंद आहे. मात्र त्यांच्या भाजपप्रवेशाचा निर्णय त्यांनी घ्यावा. जसा मला भाजप-सेनेनं सन्मान दिला तसाच माझ्या वडिलांनाही देतील याची खात्री आहे.' अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली होती.
VIDEO: खाकी वर्दीतील गायकाची शेतकऱ्यांसाठी वरुणराजाला साद