औरंगाबाद, 26 डिसेंबर : 'तुम्ही माझा पालघर करणार आहात' असं म्हणत एका महाराजाने गावकऱ्यांच्या अंगावर तलवार घेऊन चाल केल्याची धक्कादायक घटना पैठणमध्ये (paithan, Aurangabad) उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जांभळी शिवारातील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. शुक्रवारी एकादशीची दिंडी मंदिरात घेऊन जात असताना रमेश शिंदे नावाच्या महाराजाने वाद घातला होता. दिंडीतील लोकांना दांडुक्याने मारहाण केली.
त्यानंतर आज सकाळी गावकरी आणि वारकऱ्यांनी रमेश शिंदे या साधू महाराजाला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले. मोठ्या संख्येनं गावकरी घराबाहेर जमल्यामुळे रमेश शिंदे महाराज चांगलाच संतापला. गावकऱ्यांनी लोकांना दांडुक्याने का मारहाण केली, असे विचारले असता तेव्हा रमेश शिंदेने गावकाऱ्यांवर दोन हातात दोन तलवारी घेऊन अंगावर गेला.
'पालघरमध्ये जे साधू सोबत केले ते माझ्यासोबत करण्याचा तुमच्या प्रयत्न आहे. समोर जर कुणी आलं तर सोडणार नाही' अशी धमकीच या महाराजाने दिली.
'तुम्ही महाराज आहात, आम्ही तुम्हाला कशाला मारणार, फक्त काल वाद का घातला हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत' असं म्हणत गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली. पण, महाराजाने कुणाचेही काही ऐकले नाही.
शेवटी गावकऱ्यांचा संताप बघून साधू महाराजांच्या पलायन केले. मात्र, पळताना महाराज जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.