रायगड, 25 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातीव महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली. तब्बल 12 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती मिळली होती. त्यानुसार मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्यात पहिला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह गॅस कटरने स्लॅब कापून काढण्यात आला आहे.
बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीनं 8 जणांना ढिगाऱ्याखालून काढलं. जखमींना स्थानिक रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं. तर ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीचा पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले अशीही प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या इमारतीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचा-PHOTOS: महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीचं पूर रेषेतच केलं होतं बांधकाम
या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार भारत गोगावले घटनास्थळी उपस्थित आहेत. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. सध्या NDRF आणि पोलिसांकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा येत असतानाही बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्याचे यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.