मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maha Political Crisis : शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा, धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात आता अशी होणार लढाई

Maha Political Crisis : शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा, धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात आता अशी होणार लढाई

फाईल फोटो

फाईल फोटो

शिवसेना नेमकी कुणाची? शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची, याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता शिवसेना नेमकी कुणाची? शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू होणार आहे.

पुढे काय होणार?

निवडणूक आयोग शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तसंच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, याची सगळ्यात आधी पडताळणी करेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने आहेत, पण पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रही देण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेनेचे आमदार-खासदार तसंच पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याचीही शक्यता आहे.

यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात.

शिवसेनेचे पदाधिकारी

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार देशातल्या प्रत्येक पक्षाला प्रत्येक 5 वर्षांनी संघटनात्मक निवडणूक घ्यावी लागते. या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुखासह इतर पदांचाही समावेश असतो. याआधी 2018 साली शिवसेनेमध्ये अंतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये झालेल्या नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली.

शिवसेनेची संस्थात्मक रचना

पक्षप्रमुख

उद्धव ठाकरे

नेते

आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे

शिवसेना नेत्यांमधल्या सुधीर जोशी यांचं काहीच महिन्यांपूर्वी निधन झालं आहे.

शिवसेना उपनेते

अनंत गिते, अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, अनंत तरे, विश्वनाथ नेरुरकर, सूर्यकांत महाडिक, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आनंदराव अडसूळ, गुलाबराव पाटील, बबनराव घोलप, अनिल राठोड, अशोक शिंदे, यशवंत जाधव, नीलम गोऱ्हे, विशाखा राऊत, मीना कांबळी, विजय कदम, सुहास सामंत, नितीन बानगुडे पाटील

शिवसेना उपनेत्यांमध्ये अमोल कोल्हे यांचंही नाव होतं, पण त्यांनी 2019 निवडणुकीआधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

2017 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती केली होती. तसंच उपनेते म्हणून ठाकरेंनी आणखी 12 नियुक्त्या केल्या होत्या. यात सुबोध आचार्य, दशरथ पाटील, विजय नाहाटा, शशिकांत सुतार, शरद पोंक्षे, हाजी अराफत शेख, लक्ष्मण वडळे, राजकुमार बाफना, अल्ताफ शेख, तानाजी सावंत, रघुनाथ कुचिक आणि विठ्ठलराव गायकवाड यांचा समावेश होता.

शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला 27 फेब्रुवारी 2018 साली शिवसेनेच्या या सगळ्या संघटनात्मक नावांची यादी दिली होती.

First published:

Tags: Cm eknath shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray