पंढरपूर, 8 जानेवारी : माढा तालुक्यातील बारलोणी इथं जमावाने पोलिसांवर हल्ला करुन आरोपीला सोडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरी, दरोडा, बॅग लिफ्टिंगसारख्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी शंकर गुंजाळ पकडण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बारलोणी या गावात दाखल झाले असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जमावाच्या हल्ल्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलिसांचं पथक गावात पोहोचताच 25 ते 30 जणांनी दगडफेक करीत आरोपीला सोडवल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे मोठा फौजफाटा घेऊन पुन्हा आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे दाखल झाले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, पोलीस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलीस शिपाई अक्षय दळवी, पोलीस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलीस शिपाई समीर शेख यांचे पथक सकाळी बारलोनी गावच्या हद्दीत तपासाच्या दिशेने पोहचले होते.
तिथे पथक आल्याचे पाहून संबधीत आरोपींनी त्यांच्या सरकारी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक सुरू केली.
या दगडफेकीत पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ला झाला तरी कुर्डूवाडी पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी धावपळ सुरू केली. तोपर्यंत सोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके पुढील कारवाईसाठी बारलोनी गावात दाखल झाली आहेत.
घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावात तणावपूर्ण शांतता पसरल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur, Pandharpur news, Solapur (City/Town/Village)