मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या एंट्रीने शिवसेनेच्या बारणेंचं गणित बिघडणार?

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या एंट्रीने शिवसेनेच्या बारणेंचं गणित बिघडणार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढतील, हे आता जवळपास निश्चित आहे.

  • Share this:

मावळ : शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगत होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढतील, हे आता जवळपास निश्चित आहे.

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली.

मावळ लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

पनवेल

कर्जत

उरण

मावळ

चिंचवड

पिंपरी

काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण ही लढाई आता श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार उतरवणार आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावणार आहे.

अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मावळमधील लढत चुरशीची ठरणार आहे.

SPECIAL REPORT : 'सेनेच्या दबावामुळे कोल्हेंना मालिका बंद करावी लागली'

First published: March 13, 2019, 7:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading