पुण्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेसचा घोळ संपेना, दिल्लीत होणार घोषणा

पुण्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेसचा घोळ संपेना, दिल्लीत होणार घोषणा

दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यातून काही नावे पुढे आली आहेत.

  • Share this:

पुणे 27 मार्च : पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ संपता संपेना. यासाठी सुरू असलेला शोध आज संपण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसने काही नावांची यादी दिल्लीत पाठवली असून आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. या संदर्भात दिल्लीत एक बैठक होणार आहे, त्या बैठकीत राहुल गांधी हे अंतिम निर्णय घेणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची दोन दिवस भेट घेतली आणि माहिती दिली.

दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यातून अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यात मोहन जोशी यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे.

भाजपने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केलीय. मात्र काँग्रेसचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

इच्छुकांची गर्दी पाहता पुण्याच्या जागेसाठी सर्वांना मान्य होईल, असा उमेदवार देणं काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आली तरीही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

यावेळी भाजपने धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

उमेदवार निवडीपूर्वी भाजपनं सर्व्हे केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजपनं अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं. गिरीश बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.

First published: March 27, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading