युतीचं अखेर जुळण्याची शक्यता,भाजप आणि शिवसेनेकडे असे आहेत मतदारसंघ!

युतीचं अखेर जुळण्याची शक्यता,भाजप आणि शिवसेनेकडे असे आहेत मतदारसंघ!

'युती झाली तर त्याचा फायदा आणि नाही झाली तर त्याचा फटका हा दोनही पक्षांना होणार आहे याची जाणीव झाल्याने दोनही पक्ष वास्तवाची जाणीव ठेवून भूमिका घेतील.'

  • Share this:

मुंबई 04 फेब्रुवारी : राज्यात शिवसेनेची भाजपवर होणारी टीका अजुनही सुरुच आहे. युतीसाठी वरकरणी आम्ही बोलत नाही असं दोनही पक्ष दाखवत असले तरी पडद्यामागून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये 25-23चे सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. चर्चे दरम्यान, शिवसेनेने भिवंडी जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. शिवसेनेने पालघर जागा देखील मागितली होती पण भाजपने ही जागा आपल्यालाच हवी असल्याचे सांगितलं आहे.

सध्या जे मतदारसंघ दोन्ही पक्षांकडे आहेत तेच मतदारसंघ कायम ठेवण्यात येतील अशी शक्यता आहे. तर इतर जागांबाबत कुठल्या पक्षामध्ये जिंकण्याची ताकद आहे याचा विचार करण्यात आला आहे. युतीचं चर्चेचं गुऱ्हाळ या आधी अनेक दिवस सुरू राहिलं होतं. त्यात गेली चार वर्ष दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यातच शिवसेनेने शेवटपर्यंत ताणून धरल्याने चर्चा सध्या पडद्याआडच राहणार आहे.

ही चर्चा दोनही पक्षातले महत्त्वाचे करत असून त्याची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जात आहे. सगळं व्यवस्थित पार पडलं तरच याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 22 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. युती झाली तर त्याचा फायदा आणि नाही झाली तर त्याचा फटका हा दोनही पक्षांना होणार आहे याची जाणीव झाल्याने दोनही पक्ष वास्तवाची जाणीव ठेवून भूमिका घेतील असंच राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

First published: February 4, 2019, 6:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading