अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा

अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाण यांनी घेतला आक्रमक पवित्रा

जालना उमेदवारी देताना आम्ही त्यांना विश्वासात घेतले होते.एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र,त्यांनी ती स्वीकारली नाही. सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला आहे,असेही अशोक चव्हाण ठणकावून सांगितले आहे.

  • Share this:

जालना, २० एप्रिल- काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत केली आहे. भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामं करत आहेत. जालन्यात एक भूमिका अन् औरंगाबादेत एक भूमिका असं चालणार नाही. सत्तारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जालना उमेदवारी देताना आम्ही त्यांना विश्वासात घेतले होते. एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. ते पक्षात होते तोपर्यत आम्ही त्यांचा आदर राखला. सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला आहे, असेही अशोक चव्हाण ठणकावून सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतही पक्षतश्रेष्ठी राहुल गांधी यांना अवगत करण्यात आले असून त्यांच्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अशोक चव्हान यांनी यावेळी स्पष्ट केले.

खरंच राष्ट्रभक्ती असेल तर भाजपने साध्वी प्राज्ञाना पक्षातून काढावं- अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी साध्वी प्रज्ञासिंगच्या वक्तव्याचा निषेध केला असून साध्वीचे वक्तव्य अतिशय गंभीर असून यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे.

शाहीद हेमंत करकरे यांच्या विषयीचे वक्तव्य निषेधार्ह असून निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन त्यांची उमेदवारी रद्द करावी. खरंच राष्ट्रभक्ती असेल तर भाजपने त्यांना पक्षातून देखील काढावं, अशी मागणी देखील त्यांनी केलीय. जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पत्रकारांशी बोलत होते

औरंगाबादमध्ये सत्तारांचं धक्कातंत्र

सिल्लोडमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण, आता त्यांनी युतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला. हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत.

अब्दुल सत्तार आणि नाराजीनाट्य

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती.

वास्तविक सत्तार हे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले.

राजीनामा देताना काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली होती.

First published: April 20, 2019, 2:23 PM IST

ताज्या बातम्या