बारामती 21 एप्रिल : लोकसभेची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. सगळ्या जगाचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. जर कोणी लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला लोक त्याला उद्ध्वस्त करतील अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. बारामतीत घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
लोकसभेच्या तीसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची शेवटची सभा बारामतीत झाली. प्रत्येक निवडणुकीत पवार हे आपल्या प्रचाराची शेवटची सभा ही बारामतीत घेत असतात. पवार जेव्हा बारामतीतून निवडणूक लढवत असत तेव्हा ते फक्त शेवटची सभा बारामतीत घ्यायचे तीच परंपरा त्यांनी याही वेळी कायम ठेवली.
याही सभेत त्यांचा सर्व रोखा हा मोदींवरच होता. त्यांनी मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.
पवारांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
मोदी 7 वेळा राज्यात प्रचाराला येऊन गेले इतर कोणतेही पंतप्रधान इतक्या वेळा राज्यात येऊन गेले नाहीत.
ते दोनच प्रश्न विचारतात की नेहरुंनी काय केलं आणि मी काय केलं? देशभरात कुठेही गेलं की ते नेहरुंबद्दल बोलतात मात्र आपण काय केलं हे सांगत नाहीत.
पाणी, शेतीचे प्रश्न कसे सोडवणार हे मोदी सांगत नाहीत. मोदी शेतीविषयी मी काय केलं काय केलं असं विचारतात? मोदी बारामतीत आले आणि म्हणाले मी शेती किंवा कोणत्याही विषयाचा प्रश्न असेल तर हक्काचं पवारांना विचारतो. असं असताना मी काहीच केलं नाही असं कसं म्हणता.
मोदी म्हणाले की माझं बोट धरुन राजकारणात आले आता मला माझ्या बोटाची काळजी वाटायला लागली आहे.
बड्या लोकांची थकबाकी सरकारनं भरली पण शेतकऱ्यांची भरली नाही. विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या कारखान्याचे कामगारांना कित्येक महिने पगार नाहीत.
जगानं दबाव आणल्यामुळे विंग कमांडर अभिनंदनची सुटका झाली. सैन्याच्या शैर्याचा राजकीय लाभ घेत असतील तर सैन्य नाऊमेद होत जाईल. या निवडणुकीत महाराष्ट्राची ताकद देशाला दाखवून दिली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati-s13p35, Lok sabha election 2019, Narendra modi, Sharad pawar