शरद पवारांवरच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींवर पलटवार

शरद पवारांवरच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा नरेंद्र  मोदींवर पलटवार

'महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशीवाय प्रसिद्धी मिळत नाही हे मोदींना माहित आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.'

  • Share this:

मुंबई 1 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. पराभव दिसत असल्यानेच मोदींनी पवारांवर टीका केली असा पलटवार राष्ट्रवादींच्या नेत्यांनी केला आहे. मोदींच्या या टीकेनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते मोदी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली. मोदींनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वर्धा येथून केला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका केली.

पवारांची माघार

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणताही कृती विचार पूर्ण विचार केल्याशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. देशातील हवा कोणत्या दिशिने वाहते हे पवारांना चांगले माहित आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. इतक नव्हे तर सध्या त्यांच्या पक्षात कौटुंबिक लढाई सुरु आहे. कोणत्या मतदारसंघातून लढायचे आणि कोणत्या मतदारसंघातून लढायचे नाही हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेक नेते निवडणुकीतून पळ काढत आहेत. अशातच शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची जहरी टीका मोदींनी केली.

सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशीवाय प्रसिद्धी मिळत नाही हे मोदींना माहित आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय. मोदींनी आपल्या पक्षाची चिंता करावी, राष्ट्रवादीची चिंता करू नये आम्ही समर्थ आहोत.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

मोदींना पवारांवर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. देशात आज सरकारविरोधी वातावरण आहे. लोक कंटाळलेले आहेत. बरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारख्या महत्त्वांच्या विषयांवरचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मोदींनी पवारांवर टीका केली.

धनंजय मुंडे मोदींवर घसरले

वर्धा इथे झालेल्या सभेत  गर्दी कमी झाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की. २०१४साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांना कळले अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे असंही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे अशी आठवणही मुंडे यांनी करून दिली.

नवाब मलिकांचे टीकास्त्र

वर्ध्यातल्या सभेला खुर्च्या रिकाम्या असल्याने मोदी भांबावले होते. काय बोलावे हे त्यांना सुचेना. म्हणून त्यांनी शरद पवारांवर टीका केली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी अडगळीत टाकलं आहे.

First published: April 1, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading