दिनेश केळुस्कर, रत्नागिरी, 4 एप्रिल : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाचं अखेर मनोमिलन झालय. युतीचे उमेदवार विनायक राउताना प्रखर विरोध करणाऱ्या भाजपाने पहिल्यांदाच स्वतंत्र मेळावा घेउन राऊतांच्या प्रचारात सहभागी होण्याचं ठरवल्यामुळे राउताना दिलासा मिळालाय . विशेष म्हणजे नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता एनडिएत नाही असं भाजपाचे नेते म्हणत आहेत. मात्र अखेरच्या टप्प्यात घडवण्यात आलेले हे मनोमिलन मतांमध्ये कितपत परिवर्तीत होईल याबाबत कार्यकर्त्यात संभ्रम आहे .
अखेर मनोमिलन
विनायक राउतांना होणाऱ्या विरोधाचं रणशिंग फुंकणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपालाच अखेर वरीष्ठ नेत्यांच्या दबावामुळे मतभेद बाजूला ठेवून राऊतांच्या प्रचारासाठी मेळावा घ्यावा लागणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच झालेल्या भाजपाच्या या समर्थन मेळाव्यात हजेरी लावणाऱ्या विनायक राऊतांनीही चार वर्षात झालेल्या आपल्या चुका पदरात घ्या असं भावनिक आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्याना केलंय.
विनायक राऊत म्हणाले, सामूहिक रीत्या बसून सुद्धा तक्रारी जाणून घेतल्या आहेत. सहाजिक आहे की आपण एकत्र लढल्या नंतर त्याच प्रकारची वागणूक आपल्याला मिळाली पाहिजे दुर्दैवाने मागच्या चार साडेचार वर्षात जे राजकीय वातावरण होतं त्यामुळे ते कदाचित होऊ शकलं नाही. पण यापुढे अशा चुका होणार नाहीत.
मत नरेंद्र मोदींनाच
विनायक राऊतांना मत म्हणजे नरेंद्र मोदीना मत असं कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी केला असला तरी दुसरीकडे नारायण राणेंच्या स्वभिमान पक्षानेही या आधीच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीनाच आपला पाठिंबा जाहीर केलाय. पण राणेंचा पक्ष आता एनडित नसल्याचं भाजपा नेते सांगत आहेत. हाच धागा पकडून राणेंचे कट्टर विरोधक असलेले दीपक केसरकरानीही भाजपाच्या सुरात आपला सूर मिसळलाय .
भाजपचे नेते प्रसादर लाड म्हणाले, स्वाभिमान पक्ष हा पहिले NDAचा घटक पक्ष होता पण विरोधात निवडणूक लढ्यामुळे आता तो आमच्या बरोबर नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही अमित शहा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे लोकांमधला संभ्रम दूर करण्याचं काम मी केलं आणि विनायक राऊत हेच आमचे युतीचे उमेदवार असतील.
एका बाणात तीन बळी
दीपक केसरकर यांनीही नारायण राणे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, राणेंनी खरंतर विचार करायला पाहिजे होता कारण आज ना उद्या हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आपली काय परिस्थिती होईल हे त्यांनी ओळखायला हवं होतं म्हणून मी एका शब्दात सांगतो की हा धनुष्यबाण सेना भाजपाने अशा रितीने मारावा की एका बाणात तीन बळी जातील असा हा बाण आहे आणि हा त्यांनीच आमच्या हातात दिलाय.
विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती नसतानाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातल्या पाच विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार निवडून आलेयत . त्यामुळे साहजिकच राऊत यांना विजयी कारण्याची अधिक जबाबदारी भाजपा ऐवजी सेनेच्याच आमदारांना घ्यावी लागणार आहे. यात त्यांना भाजपा कार्यकर्त्यांची शंभर टक्के साथ मिळते का हे 23 !मे लाच स्पष्ट होणार आहे .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.